Friday, 3 March 2017

संकलीत कविता

जबरदस्त कविता!एकदा वाचली तर आणखी एकदा वाचल्याशिवाय रहावणार नाही....

असे जगावे दुनियेमध्ये,
आव्हानाचे लावुन अत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर..

नको गुलामी नक्षत्रांची,
भीती आंधळी ताऱ्यांची,
आयुष्याला भिडतानाही,
चैन करावी स्वप्नांची..

असे दांडगी इच्छा ज्याची,
मार्ग तयाला मिळती सत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर..

पाय असावे जमिनीवरती,
कवेत अंबर घेताना,
हसू असावे ओठांवरती,
काळीज काढुन देताना..

संकटासही ठणकावुन सांगावे,
आता ये बेहत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर..

करुन जावे असेही काही,
दुनियेतुनी या जाताना,
गहिवर यावा जगास  सा-या,
निरोप शेवटचा देताना..

स्वर कठोर त्या काळाचाही,
क्षणभर व्हावा कातर कातर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर...

विंदा करंदीकर

No comments:

Post a Comment